सर्वमंगलमांगल्‍ये शि‍वे सर्वार्थसाधके शरण्‍ये त्र्यंबके गौरि‍ नारायणि‍ नमोस्‍तुते.
 
 
नवरात्रोत्सवाचे स्वरूप:
देवीभोयरे येथे इतरही मंदिरे आहेत व वेगवेगळे उत्सवही साजरे केले जातात पण अंबाबाईची नवरात्रोत्सव हा इथला मुख्य व खास सण आहे. घटस्थापना, सकाळी पूजा आरती, संध्याकाळी महाआरती व आरती नंतर प्रदक्षिणा, छबिना व पंचपदी असे इथल्या नवरात्राचे थोडक्यात स्‍वरूप आहे.
नवरात्रांत देवीची आरती झाल्यावर गावांतील इतर सर्व देवांच्या आरत्या होतात. त्याला छबिना असे म्हणतात. देवीची आरती झाल्यावर भक्तामंडळी आणि आरती घेणारा गुरव (पुजारी) उघडा, आरती घेऊन व मोरपिसांचा कुंचा घेऊन निघतो. पाऊस, पाणी असेल तरीही गाव प्रदक्षिणा होतेच. बारवेजवळ श्री ज्ञानेश्वराची, गणपती मंदीराजवळ गणपतीची व शंकराची, पिंपळाजवळ नर‍‍‍हरिची, समाधी स्थळाजवळ स्वामींची, शिवमंदीरजवळ शंकराची व नृसिंहाची व नंतर मारुतिची पारंपारिक आरती मारुतिच्या देवळापुढे म्हणतात. नंतर दत्ताची आरती, पांडुरंगाच्या देवळापुढे विठठलाची पारंपारिक आरती म्हणून छबिना अंबाबाईच्या देवळात येतो. इथपावेतो गाव प्रदक्षिणा पुरी होते. नंतर छबिना देवळामधे दोन प्रदक्षिणा घालुन माहूरगडची पारंपारिक पदे म्हणत पर्ण करतात. रंग शिळेवर नाचावे, सावळया हरीला भेटावे हे म्हणत गावप्रदक्षिणा पुरी करतात. रंग शिळेवर नाचावे, सावळया हरीला भेटावे हे म्हपणत गावप्रदक्षिणा पुरी करतात. नवरात्रातील गाव प्रदक्षिणा व आरती ही प्रतिपदे पासून नवमीच्या होमापर्यंत रोज असते. होम दस-याच्या आदल्या दिवशी असतो. होम झाल्यावर देवी पुनश्च देवळात येते असे मानतात त्यामुळे होमाला, दुस-याला फक्त‍ पंचपदीच होत. दस-याला देवी शिलंगणाला पालखीमधून सालंकृत छत्रचामर सवैभव आबदागीर चवरी सह जाते म्हणून त्या दिवशी गाव प्रदक्षिणा नसते. कारण देवीच पालखीतून गावांत मि‍रविण्यात येते. घरोघरी पालखी थांबते. प्रत्येक ठिकाणी जसे ज्याचे सामर्थ्य असेल तसे देवीचे पूजन, हळदकुंकू, ओटी वगैरे सोपस्कार होतात. देवीची पाऊले घराला लागली असे समजून इंडा पिडा गेली. सुख समृध्दी आली असे मानण्यात येते. नवरात्रात देवळात गाभा-यामधे घरोघरीच्या समया, नंदादीप लोक लावतात. कुणाचे नवसाचे तुपाचे दिवेही असतात आणि ते अखंड तेवतील असे आवर्जून पहाण्यात येते. तसेच गाभा-यात बसून गुरूजी पाठ (नवचंडी) करतात. तसेच नवरात्र बसण्यापूर्वी किंवा होमाच्या अगर दस-याच्या दिवशी पंचामृती अभिषेक करतात. गावातील लोक सुखासमाधाने रहावेत, त्यांचे उद्योग, शेती वगैरे विनाविघ्न चालावे यासाठीच हे करण्यात येते.
नवरात्रात रात्रीचे जगंदबेच्या पूजनाने ती प्रसन्न होते व भक्तांना सदबुध्दी देऊन सुखात ठेवते असे समजले जाते. नवरात्रात पूजेचा, मूळ उददेश स्त्री ही वंदनीय आहे. भगिनी, पुत्री, माता, पत्‍नी सर्व रुपाने ती पुरूषाचा संसार सुखाचा करते. ती साक्षात देवीरूप आहे म्हणून तिला गृहलक्ष्मी समजतात. तिच्याकडे आदरयुक्त दृष्टीने पहावे, सन्मानाने वागवावे हे जो भाविक भव्त करेल त्यालाच देवीची कृपा लाभेल अन्यथा नवरात्रातील पूजेला अर्थ ना‍ही. यत्र नार्यस्तु पूज्यन्‍ते, रमन्‍ते तत्रदेवता ही उव्ती काय सांगते ?
 
 
कोल्हापुर (महालक्ष्मी)
तूळजापुर (भवानीमाता)
माहूर (रेणुकामाता)
 
 
  Copyright 2011 Devibhoyare. All Rights Reserved